मंगळवार, २० ऑक्टोबर, २०१५

विज्ञानातील प्रयोग

🔬मध्याकडेच जाणार.

साहित्य – पाणी, पाण्याचा मग, वाटी, प्लॅस्टिकचे झाकणकृती – एका मगमध्ये पाणी भरून घ्या. छोट्या प्लॅस्टिकच्या बाटलीचे झाकण घ्या. ते उलटे धरून हलकेच मगमधल्या पाण्याच्या मध्यभागी ठेवा. झाकण कडेकडे सरकते. आता एका वाटीत पाणी घेऊन मगमध्ये थोडे थोडे टाका. पाण्याची पातळी मगच्या कडेच्या वर जाईल तसे कडेला गेलेले झाकण मध्याकडे सरकताना दिसेल.
मगच्या पातळीच्या वर असलेल्या पाण्यातील कणांची ओढ त्यांना एकमेकांजवळ आणते, त्याबरोबर झाकणही मध्याकडे ढकलले जाते.
🔬ऐकण्याचा नकाशा काढा.

साहित्य – एक व्यक्ती, फोन, मोबाईल, कापूस, रुमाल, कागद, पेन.कृती – एका व्यक्तिला एका खोलीत फोन शेजारी बसवा. एक मोबाईल घेऊन फोनवरून तो डायल करायला सांगा. तो आवाज लक्षात ठेवायला सांगा. बसलेल्या व्यक्तीच्या एका कानात कापसाचा बोळा बसवा तसेच रुमाल बांधून तिचे डोळे झाका. एका कागदावर खोलीचा नकाशा काढा. नकाशात व्यक्तीचे स्थान दाखवा. मोबाईलला रिंग केल्यावर जिथून आवाज येतो तिकडे बोटाने दाखवायला सांगा. व्यक्तीने दाखवलेल्या दिशेला रेघ ओढा टोकाला (१) अंक लिहा तसेच प्रत्यक्ष मोबाईलच्या जागी नकाशात (1) लिहा. असे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून करा. प्रत्यक्ष जागा आणि दाखवलेली जागा यातला फरक पहा. दुसरा कान बंद करून हाच प्रयोग करा. ऐकण्याचा नकाशा मिळेल.
आपल्याला नेमकी दिशा लक्षात येण्यासाठी दोन्ही कानांमध्ये ऐकू येणार्‍या आवाजात फरक असतो.

🔬भिंगरीवरचे रंग.

साहित्य – भिंगरी, वेगवेगळ्या रंगांचे कागद, कात्री, गोंद.कृती –एक भिंगरी घ्या. भिंगरीच्या आकारात मावतील अशा वर्तुळाकारात प्रत्येक रंगाचा कागद कापून घ्या, प्रत्येक वर्तुळाकार कागदाच्या समान सहा पाकळ्या करा. सहा रंगांच्या प्रत्येकी एक अशा सहा पाकळ्या भिंगरीच्या वरच्या बाजूला गोंदाने डकवा. भिंगरी वेगात फिरवा. सहा रंगांची मिळून दिसणारी रंगछटा पहा.
अनेक रंगांच्या एकत्रिकरणाने मिळणारी रंगछटा सहात नसलेल्या छटेच्या पूरक रंगाची असते.

🔬गूळ नाही साखर नाही पाणी मात्र गोड.

साहित्य – पाणी, तुरट आवळा, पेला.कृती – एका पेल्यात पाणी घ्या. एक घोट पाणी प्या. पाण्याची चव लक्षात ठेवा. पाण्यात गूळ, साखर किंवा अन्य कोणताही गोड पदार्थ घालू नका. तुरट आवळ्याचा एक तुकडा चावून चावून खा. आता एक घोट पाणी तोंडात घ्या. पाणी गोड लागेल.
आवळ्याच्या तुरट चवीमुळे जीभेवरच्या चव ग्रंथी काही प्रमाणात बधीर होतात. त्या वेळी पाण्यांच्या रेणूंचा स्पर्श झाला की मेंदूत त्याचा अर्थ गोड असा लावला जातो.

🔬स्वेटर गरम करतो गार राखतो.

साहित्य – तुम्ही, स्वेटर, बर्फ, घड्याळ.कृती – एक स्वेटर घ्या. अंगात घाला. घड्याळात वेळ बघा. तुमच्या शरीराला हळुहळू उबदार वाटू लागेल. काही वेळाने घाम आल्याचे जाणवेल. पुन्हा घड्याळात बघा. किती वेळ लागला त्याची नोंद घ्या. स्वेटर अंगातून काढा. बर्फाचा एक घट्ट गोळा करून घ्या. बर्फाला स्वेटर घाला. तुम्हाला घाम फुटायला लागला तितका वेळ तो ठेवा. मग स्वेटर काढा. गरम होऊन बर्फ वितळला का तपासा.स्वेटर उष्णतारोधक पदार्थाचा बनवलेला असतो. उष्णतेचे वहन होण्यात त्याचा अडथळा येतो.

🔬कडेकडेच जाणार.

साहित्य – पाणी, पाण्याचा मग, प्लॅस्टिकचे झाकणकृती – एका मगमध्ये पाणी भरून घ्या. छोट्या प्लॅस्टिकच्या बाटलीचे झाकण घ्या. ते उलटे धरून हलकेच मगमधल्या पाण्याच्या मध्यभागी ठेवा. झाकण कडेकडे सरकते. कितीही वेळा करून खात्री करून घ्या. पाण्याच्या मग ऐवजी त्यापेक्षा मोठ्या तोंडाचे भांडे घेऊन काय फरक पडतो, ते पहा.
पाण्याच्या कणांमध्ये एकमेकांशी असलेल्या ओढीच्या जोरापेक्षा पाण्याच्या कणांना मगच्या कणांशी ओढीचा जोर जास्त असतो. त्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागाची ओढ झाकणाला कडेकडे ढकलते.

🔬मिठातून उजेड .

साहित्य – जाड मीठ, पाणी, काचेचा पेला.कृती – हा प्रयोग पूर्ण अंधारात करायला हवा. एक काचेचा पेला घ्या. त्यात पाणी भरा. हातात मीठाचे खडे घ्या. पूर्ण अंधार करा. मिठाचा एक खडा पाण्यात टाका. खडा विरघळत जाईल तसतसा अतिशय मंद हिरवट उजेड पडलेला दिसेल.निसर्गत: मिठाचे स्फटिक बनत असताना त्यात कुठे कुठे आयनांची रचना अपुरी राहीलेली असते. मीठ विरघळताना तेथे अडकलेले मुक्त आयन पाण्याच्या संपर्कात येतात. आयनांची रासायनिक क्रिया होते त्यावेळी उजेड रुपात ऊर्जा बाहेर पडते.

🔬काळवंडणारा रंग.

साहित्य – रंगीत छपाई असलेला कागद, विविध रंगांचे जिलेटीनचे कागद..कृती – एक रंगीत छपाई असलेला कागद घ्या. त्यातल्या वेगवेगळ्या रंगांच्या छटा नीट बघून घ्या. कोणत्या तरी एका रंगाचा जिलेटीनच्या कागदाचा तुकडा घ्या. तो तुमच्या डोळ्यांसमोर धरा. रंगीत छपाई असलेल्या कागदावरचे रंग बघा. कोणता रंग काळा किंवा गडद करडा दिसतो ते बघा. तो रंग आणि जिलेटीनचा रंग यांना पूरक रंग म्हणतातहिरवी शाई लाल रंग शोषून घेते आणि बाकी सगळे रंग परावर्तित करते त्याचा परिणाम म्हणून तो भाग हिरवा दिसतो. लाल जिलेटीन हिरवा प्रकाश शोषून घेतो त्यामुळे हिरवा भाग अप्रकाशित किंवा काळा दिसतो.
🔬एका कानाने ध्वनीवेध.

साहित्य – फोन, मोबाईल, कापूस, रुमाल.कृती – एका व्यक्तिला एका खोलीत फोन शेजारी बसवा. एक मोबाईल घेऊन फोनवरून तो डायल करायला सांगा. तो आवाज लक्षात ठेवायला सांगा. बसलेल्या व्यक्तीच्या एका कानात कापसाचा बोळा बसवा तसेच रुमाल बांधून तिचे डोळे झाका. मोबाईलला रिंग केल्यावर जिथून आवाज येतो तिकडे बोटाने दाखवायला सांगा. असे मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून करा. एका कानाने ऐकून नेमकी दिशा सांगायला कठीण जाते.आपल्या दोन्ही कानांमध्ये ऐकू येणार्‍या आवाजात फरक पडतो त्यामुळे आपल्याला नेमकी दिशा लक्षात येते.

🔬गरम फुंकर गार फुंकर.

साहित्य – स्वत:.कृती – एका हाताची मागची बाजू तोंडासमोर न्या. गाल फुगवा. ओठात छोटीशी फट ठेवून हातावर फुंकर मारा. फुंकरीमुळे गार वाटते. आता ओठाची फट थोडी मोठी करून फुंकर मारा. फुंकरीचा गारवा कमी होईल. तोंड जास्तीत जास्त उघडे ठेवून हाss असा आवाज करत फुंकर मारा. ही गरम फुंकर.फुंकर मारताना तोंडातली जास्त दाबाची हवा वेगाने बाहेर येताना थंड होते. तोंड पूर्ण उघडून मारलेल्या फुंकरीचे तापमान शरीराच्या आतल्या भागाइतके असते.

🔬गरम फुंकर बसवते झाकण पक्के.

साहित्य – स्टीलचा पेला, प्लॅस्टिकचे झाकण.कृती – एक स्टीलचा पेला घ्या. पेल्याच्या तोंडापेक्षा मोठ्या आकाराचे प्लॅस्टिकचे हलके झाकण घ्या. डाव्या हातात पेला उलटा धरा. त्याच्या तोंडाखाली झाकण ठेवून ते उजव्या हाताच्या मधल्या बोटाने हलके दाबा. बोट काढा. झाकण खाली पडते. आता पेल्यात गरम फुंकर पटकन पेला उलटा धरा. त्याच्या तोंडाखाली झाकण ठेवून ते उजव्या हाताच्या मधल्या बोटाने हलके दाबा. बोट काढा. झाकण पेल्याला चिकटून राहाते.गरम फुंकरीमुळे पेल्यातील हवा विरळ होते, झाकण लावून गार झाल्यावर तिचा दाब कमी होतो. बाहेरच्या हवेच्या दाबामुळे झाकण पक्के बसते.

स्त्रोत : मराठी विज्ञान परिषद, पुणे